हरिश्चंद्रगड गिर्यारोहण
गुलाबी थंडीचे दिवस आणि पौर्णिमेची चांदणी रात्र , किर्रर्र करणारे रातकिडे आणि जंगलात दमछाक करणारी वाट, जागोजागी चकवे, आणि १० धाडसी व निर्भीड तरुणांचा समूह धरतो वाट हरिश्चंद्र गडाची. ४नोव्हेंबर २०१७ ,मार्तंडभैरव ट्रेकर्स या गिर्यारोहक समूहाचा पहिला वाहिला गिर्यारोजनाचा प्रयत्न जो उत्तमरीत्या पूर्णत्वास आला. मार्तंडभैरव ट्रेकर्स ने संस्थेच्या पहिल्या ट्रेकचे निवडलेले ठिकाण म्हणजे शंभू शंकराच्या पुरातन , साधारण १२व्या शतकात झंझ राज्याने स्थापन केलेल्या शिवलिंग व पुरातन शिवमंदिर असलेला हरिश्चंद्र गड . सह्याद्रीच्या उपरंगेत असलेला अकोले तालुक्यातील अवघड पण रोमहर्षक असा हरिश्चंद्र गड.संदीप व प्रशांत या दोघांनी संपूर्ण ट्रेक चे व्यवस्थापण केले व त्याप्रमाणे ४नोव्हेंबर ला सायंकाळी ५वाजता नाशिक हुन आम्ही १०गिर्यारोहकांनी मार्गक्रमण केले. संदीप आहेर, डॉ प्रशांत टर्ले,डॉ मनोज बर्डे,डॉ पिंगळ प्रशांत,नितीन उगले, शशी पाटोळे,योगेश सोनवणे,बोरस्ते व मी , मी म्हणजे डॉ सत्यजित निकम.आम्ही सर्वजण रात्री १० वा.राजूर मार्गे पाचनई या पायथ्याशी असलेल्या गावी पोहोचलो.या ठिकाणी असलेल्या हॉटेल हरिओम येथे चुलीवरचे उत्तम जेवण तयार करून जेवणाचा आस्वाद घेतला व रात्री१२वाजेच्या सुमारास गिर्यारोहनस सुरवात केली. चंद्राच्या दुधाळ प्रकाशात व जंगलातील झाडी मध्ये गरज पडल्याड टॉर्च चा वापर करीत आम्ही रात्री ३वा .च्या सुमारास गड माथ्यावरील पठारावर पोहोचलो .सोबत असलेले तंबू तयार करून त्यात गुलाबी आणि झोंबणार्या थंडीत थकल्यामुळे लवकर झोपी गेलो.मात्र पहाटे ६च्या सुमारास प्रचंड वाढलेल्या थंडीमुळे आमची झोप मोडली व आम्ही सर्वांनी शेकोटी करून थंडी दूर करण्याचा प्रयत्न केला!. सकाळी ७च्या सुमारास चहा पाणी करून तारामती शिखराकडे आम्ही आमचा प्रवास सुरु केला व साधारण दीड तासात शिखरावर पोहोचलो , रस्त्यात जाताना छायाचित्रे टिपली, शिखरावर पोहोचतास मराठा स्वराज्याची शान असलेला भगवा झेंडा उंचावर निळ्या आकाशात डौलाने फडकत असल्याचा दिसतो,नव्हे उंच गगनाला भिडलेला दिसतो.जणू काही आकाशाच्या उंचीशी स्पर्धा करताना भासतो, नव्हे करतोच. निरब्र निळे आकाश ज्यात कुठलाही दुसरा रंग नाही फक्त आणि फक्त निळे आकाशच व त्या आकाशात भगवा झेंडा जर कुणाला बघण्याची इच्छा असेल तर त्याने नक्कीच हरिश्चंद्रगडावर जावे .हा सुंदर देखावा बहितल्यानंतर आम्ही आमचा मोर्चा वळवला तो कोकण कड्याकडे . निसर्गाची एक अनोखी निर्मिती म्हणजे कोकण कडा, हा रोमन लिपीतील U या आकारातील असून या कड्यावर झोपून दरी व वक्र डोंगर कड्याचे विहंगम दृश्य बघावयास मिळते. कोकण कडा बघून झाल्यानंतर आम्ही सर्व उताराच्या वाटेला लागलो व पुन्हा डोंगराच्या पठारावर आलो. या पठारावर सुंदर पुरातन शिवमंदिर असून ते १२व्या शतकात झंझ राज्याने बांधले आहे .दुरून बघताना मंदिराचा फक्त कळसच दिसतो ,करण मंदिराच्या भिंतींचा भाग हा जमिनीपासून खोल भागात आहे.हे मंदिर बांधताना बेसॉल्ट या जातीच्या खडकाचा वापर केलेला दिसतो त्यामुळे व या मंदिराची पुरातत्व विभागाकडून उपेक्षा होत असल्याने मंदिराची झीज झालेली दिसते तसेच मंदिरावर असलेले कोरीव कामही काही अंशी पुसट होत चालले आहे. उत्पन्नाचा स्त्रोत ज्या ठिकाणी जास्त असतो त्याच ठिकाणी आपले पुरातत्व विभाग देखभाल करण्यात गुंग झालेले असते, आणि हरिश्चंद्रगडा सारख्या ठिकाणी लक्ष देण्यात विभागाला मात्र वेळ नसतो.या मंदिरात पुरातत्व विभागाची सूचना पाटी ही अक्षरशः एका कोपऱ्यात पडलेली आहे.त्याच प्रमाने मंदिरात जळण्याचे लकडेही जमा करून ठेवल्याचे दिसते मंदिर हे हेमाडपंथी बांधकाम शैलीचे असून मंदिराच्या भिंतीवर उत्कृष्ठ कोरीव काम आम्ही बघितले, मात्र भिंतीवर असलेली हत्तीची मूर्तीने आमचे लक्ष वेधून घेतले.या मंदिरासमोर एक पाण्याचा मोठा हौद असून आजू बाजूला पाण्याचे अनेक टाके आहे.मंदिरात पण असेच पाण्याचे टाके असून पिण्यायोग्य शीतल पाणी हे घश्याची तृष्णा भागवते. या मंदिर परिसरात जुन्या दगडी वाड्याचे जोते आढळून येते .म्हणजेच या ठिकाणी पूर्वी सुंदर दगडी वाडा असावा. या संपूर्ण मंदिर परिसरात पिण्याच्या पाण्याची तसेच विसाव्याची चांगली सोय आहे.
हरिश्चंद्र गडावर अनेक अर्धवट अवस्थेत कोरलेल्या गुहा आहे .मंदिराच्या उत्तरेला एक मोठी गुहा असून हिला केदारनाथ गुहा असेही म्हणतात या गुहेत केदारेश्वराचे विशाल ज्योतिर्लिंग आसून या ज्योतिर्लिंगाभोवती गुहेत कमरेवर पाणी आहे ज्याचे तापमान हे 0 अंश च्या आसपास असावे.केदारनाथ गुहेत चार खांब असून तीन तुडलेले असून एक पूर्णपने उभा आहे, आख्यायिकेनुसार ज्या दिवशी हा चौथा खांब मोडेल त्या दिवशी पृथ्वीचा नाश होईल. केदारेश्वराचे दर्शन घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला सुरवात केली व हरिश्चंद्र गड साधारण दीड तासात उतरून खाली गड पायथ्याच्या पाचनई या गावात ज्या मार्गाने गेलो त्याच मार्गाने खाली उतरून आलो.५नोव्हेंबर २०१७ दुफारी 3 वा.आमचे गिर्यारोहण पूर्ण झाले व आमच्या सोबत असलेल्या गाडीने आम्ही रात्री ९च्या सुमारास घरी पोहोचलो.
Comments
Post a Comment